
झटपट पैशासाठी हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्याला इस्टेट एजंटला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. त्याच्याकडून 3 कोटींचा गांजा जप्त केला. मोहम्मद शरीफ असे त्याचे नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. बँकॉक येथून एक जण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली.
शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला. हवाई गुप्तचर विभागाने मोहम्मद शरीफला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यातील खाऊच्या पाकिटात हायड्रोपोनिक गांजा होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 3 कोटी रुपये इतकी आहे. गांजा तस्करी प्रकरणी त्याचा एनडीपीएस कायद्यानुसार जबाब नोंदवला.
मोहम्मद हा इस्टेट एजंट असून तो महिन्याला 20 हजार रुपये कमवतो. झटपट पैशासाठी तो गांजा तस्कर बनला. तो नुकताच बँकॉक येथे गेला होता. तेथे त्याने हायड्रोपोनिक गांजा खरेदी केला. त्याने एकाकडून कर्ज घेतले होते. त्याने त्या पैशातून परदेशी चलन खरेदी केले. तो पहिल्यादाच गांजा खरेदी करून नफा कमवणार होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.