पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगार काढतोय ईसीजी, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी शताब्दी रुग्णालयामध्ये चक्क चतुर्थ श्रेणी कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांचे ‘ईसीजी’ काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे गोवंडी शताब्दी रुग्णालय हे पूर्व उपनगरातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांसाठी सोयीचे रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी ईसीजीचे काम एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडून होत असल्याचा एक व्हिडीओच ‘सपा’च्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी सोशल मीडियात व्हायरल केला. यामुळे रुग्णालयातील गंभीर प्रकार समोर आला असून सर्वसामान्यांमधून रुग्णालय प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

रुग्णालय म्हणते, प्रशिक्षण दिलेय…

गोवंडी शताब्दी रुग्णालयात गेल्या चार वर्षांपासून ईसीजी टेक्निशियनचे पद रिक्त आहे. ते भरले जात नसल्याने या ठिकाणच्या ग्रॅज्युएट आणि हुशार कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली फक्त सूचनांनुसार काम करण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय संबंधित कर्मचाऱ्याला टेक्निकल ट्रेनिंग देण्यात आले असून डॉक्टरांच्या सूचनांनुसार काम करण्यास सांगण्यात आल्याचे गोवंडी शताब्दीचे अधिष्ठाता डॉ. सुनील पकाळे यांनी सांगितले.

35 टक्के रिक्त पदे भरा

गोवंडी शताब्दी रुग्णालयात तब्बल 35 टक्के रिक्त पदे असल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असल्याने रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी माजी नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी केली. रुग्णालय प्रशासन जर ईसीजीसाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नाही असे म्हणत असेल तर शासकीय रुग्णालयांमध्ये पात्र शैक्षणिक अर्हता असणाऱ्यांकडून कोर्स का करून घेते, असा सवालही त्यांनी केला.