मढ किनाऱ्याजवळ मासेमारी करणारी बोट बुडाली, मालवाहू जहाजाने धडक दिल्याने अपघात

मालाडमधील मढच्या समुद्रकिनाऱ्यावर रविवारी पहाटे बोट दुर्घटना घडली. मासेमारी करणाऱ्या एका बोटीला मालवाहू जहाजाने धडक दिली. यानंतर बोट पाण्यात बुडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणी जखमी झाले नाही. बोटीवरील खलाशाला वाचवण्यास स्थानिकांना यश आले आहे.

दुर्घटनाग्रस्त बोट मढ कोळीवाड्यातील रहिवासी हेमदीप हरिश्चंद्र टिपरी यांच्या मालकीची होती. बोटला एका मालवाहू जहाजाने धडक दिल्यानंतर ती बुडाली. सावती नावाच्या स्थानिक बचाव पथकाने बुडालेली बोट शोधून काढली. नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनीही शोध आणि बचाव कार्यात मदत केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.