अंधेरीत इमारतीला आग, महिलेचा मृत्यू

अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातील एका इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत अभिना संजनवालिया (34) या महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये दहा दिवसांच्या बाळासह एका चिमुकल्याचा समावेश आहे. आग आणि धुरामुळे अनेकांना बाहेर पडण्यात अडचणी येत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत रहिवाशांना बाहेर काढले. जखमींवर कोकिलाबेन, कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

अंधेरी लोखंडवाला परिसरातील अशोक अ‍ॅकॅडमी लेनमधील आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 104 मध्ये शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. घरातील सदस्य जागे होईपर्यंत आग आसपासच्या घरांमध्येही पसरली. रहिवाशांनी आरडाओरडा करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.