अंधेरीत गॅस पाइपलाइन फुटून आगीचा भडका, अपघातात तीन जखमी; रिक्षा, दोन दुचाकी जळून खाक

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीमध्ये शनिवारी मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध असलेली महानगर गॅस पाईपलाईन फुटून लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाले तर रिक्षा आणि दोन दुचाकी अशी तीन वाहने जळून खाक झाली. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. जखमींवर बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीत गुरुद्वारासमोर असलेल्या रस्त्यातून जाणारी महानगर गॅस कंपनीची पीएनजी पाईपलाईन शनिवारी मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता फुटली. फुटल्यानंतर शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यात रस्त्यावर असलेला रिक्षाचालक आणि दोन दुचाकीस्वार जखमी झाले. यात त्यांच्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, अग्निशमन दलाने सुमारे एक तास केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना तातडीने जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरेश गुप्ता (52) हे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत अरविंदकुमार पैथाल (21) आणि अमन सरोज (22) हे दुचाकीस्वार प्रत्येकी 50 टक्के भाजले आहेत, मात्र या दोघांनी डॉक्टरांकडून स्वतःच्या जोखमीवर डिस्चार्ज घेतला आहे.

शिवसेनेने केली बचावकार्यात मदत

दुर्घटनेची माहिती मिळतात जोगेश्वरीचे शिवसेना आमदार बाळा नर यांच्यासह शेकडो शिवसैनिक तातडीने दुर्घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्यात मदत केली. त्याचबरोबर नर यांनी रात्री रुग्णालयात जाऊन जखमींवर सर्वोतोपरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिवसेना व्यापार विभागाचे संजय सावंत, उपशाखाप्रमुख शैलेश बंदलकर, सुमित बोभाटे, प्रमोद पटेल, दीपक राठोड, वैभव सावंत, दीपक पुरोहित, शाखाप्रमुख मंदार मोरे आदी उपस्थित होते.

अनधिकृत खोदकामामुळे आग

शेर-ए-पंजाब कॉलनीत लागलेली आग ही रस्त्याच्या मधोमध अनधिकृतपणे जेसीबीने खोदकाम केल्यामुळे लागलेली आहे. आधी केलेल्या खोदकामामुळे गॅस पाईपलाईन रात्री फुटली आणि आग लागली. गॅस पुरवठा बंद केला असून पाईपलाईनचे काम पूर्ववत झाल्यानंतर गॅस पुरवठा सुरळीत केला जाईल, अशी माहिती महानगर गॅस कंपनीकडून देण्यात आली.

अशी करा तक्रार

मुंबईत कुठेही अनधिकृतपणे खोदकाम करण्यात येत असेल तर अशा वेळी जमिनीखालील महानगर गॅस पाईपलाईन फुटून त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांनी 1800 2100 2100 या टोल फ्री नंबरही संपर्क साधावा, असे आवाहन महानगर गॅस कंपनीने केले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

कॉलनीत कोणतीही परवानगी न घेता जेसीबीमार्फत करण्यात आलेल्या खोदकामाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. हे खोदकाम कोणत्या व्यक्ती किंवा संस्थेकडून करण्यात आले होते याचा तपास पोलीस करत आहेत. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.