केवळ दैव बलवत्तर म्हणून… कुर्ल्यामध्ये फिनिक्स मॉलच्या आगीत 150 जणबचावले! अग्निशमन दलाची कौतुकास्पद कामगिरी

कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे गर्दीमध्ये घबराट पसरून प्रचंड धावपळ उडाल्याची घटना घडली. ही आग टेरेसवर लागली असली तरी संपूर्ण मॉलमध्ये धूर पसरल्याने आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 150 जणांची सुखरूपणे सुटका केली.

कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशनच्या विरुद्ध दिशेला हा सुप्रसिद्ध फिनिक्स मॉल आहे. या मॉलच्या टेरेसवर रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी अचानक आगीचा भडका उडाला. या ठिकाणची वायरिंग आणि जळाऊ सामानामुळे आगी काही वेळातच भडकली. यावेळी आगीचा धूर मॉलच्या सर्व मजल्यांवर पसरला. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या खरेदीदारांसह दुकानदारांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. नागरिकांनी दिसेल त्या मार्गाने मॉलबाहेर पडण्यासाठी धावपळ केली, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या 15 ते 20 मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवून सुमोर दीडशे नागरिकांची सुखरूप सुटकाही केली. सुटका केलेल्यांमध्ये ज्येष्ठांसह लहान मुलांचाही समावेश होता. सुदैवाने या आगीत कुणी जखमी झाले नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली. आगीमुळे एलबीएस मार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. आगीमुळे संपूर्ण मॉल रिकामी करून रात्री उशिरापर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरू होते.

…तर नोटीस बजावणार

फिनिक्स मॉलच्या आगीत कुणी जखमी झाले नसले तरी या ठिकाणी फायर फायटिंग सिस्टम सुरू होती की नाही याचा तपास पोलीस, अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. तर फायर फायटिंग सिस्टम बंद असल्यास मॉल प्रशासनाला नोटीस बजावणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस, अग्निशमन दलाकडून सुरू आहे.