पालिकेच्या मार्केटमध्ये प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास 500 रुपयांचा दंड!

मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण, पर्यावरणाला पोहोचणारी हानी आणि पुरासारख्या समस्या रोखण्यासाठी आता पालिकेच्या मंडया-मार्केटमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे गाळेधारकांसह ग्राहकांनाही मंडयांमध्ये कापडी पिशवीसारख्या पर्यावरणपूरक साधनांचा वापर करावा लागणार आहे. यामध्ये गाळेधारक किंवा ग्राहकांकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. नव्या वर्षात याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.

नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या 91 मंडया सध्या कार्यरत आहेत. या मंडयांचा विकास पालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये माहीमचे सुप्रसिद्ध गोपी टँक मार्केट, दादरचे क्रांतिसिंह नाना पाटील मार्केट, नळबाजार परिसरातील मिर्झा गालिब मार्केट, ग्रॅण्ट रोडचे लोकमान्य टिळक मार्केट परिसरातील महात्मा फुले क्रॉफर्ड मार्केटचाही कायापालट होत आहे. मात्र पालिकेच्या मंडयांचा विकास करताना या ठिकाणी आता पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजनाही करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यावरणाला हानी पोहचवणाऱया प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालून पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराची सक्ती करण्यात येणार आहे.

…म्हणूनच होणार कार्यवाही

मुंबईत 26 जुलै 2005 रोजी आलेल्या महाप्रलयानंतर पाणी तुंबण्याचे प्रकार टाळण्यासाठी 2006 पासून ‘ब्रिमस्ट्रोवॅड’ उपक्रमांतर्गत पालिकेच्या माध्यमातून पाणी तुंबण्याचे प्रमाण, ठिकाणे कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा पूर प्लॅस्टिक पिशव्या पर्जन्य जलवाहिन्या, गटारांमध्ये अडकल्याने वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून मुंबई प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

ओल्या कचऱ्यापासून होणार कंपोस्ट खत

  • पालिकेच्या मंडयांमध्ये दररोज हजारो मेट्रिक टन भाज्या, फळे येत असतात. यापासून शेकडो टन ओला कचराही निर्माण होत असतो. हा कचरा सध्या पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. मात्र आता या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे.
  • यासाठी आवश्यक यंत्रणाही निर्माण करण्यात येईल. तर सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठीदेखील यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकाली निघणार असून पालिकेचे मार्केट स्वच्छ-सुंदर होणार आहेत.