
‘एक रुपयात पीक विमा’ योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची स्पष्ट कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत दिली. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिह्यांसाठी आणलेल्या योजनेत चार हजार कोटी दिले गेले. मात्र, यातील सर्वाधिक निधी संभाजीनगर आणि जालन्यात खर्च झाला. त्यामुळे विदर्भाच्या वाट्याला फार निधी आला नाही, याकडे भाजपचे संजय कुटे यांनी विधानसभा चर्चेत लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना कोकाटे यांनी पीक विमा योजनेत गैरप्रकार झाल्याची कबुली दिली.
31 मार्चपर्यंत पीक विम्याची रक्कम देणार
अभ्यास करून अद्ययावत आणि सुटसुटीत पीक विमा योजना आणली जाईल. तसेच 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येईल. तृणधान्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी मिलेट बोर्ड स्थापण्यात येणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
नवीन योजना आणणार
‘पुढील चार-आठ दिवसांत हा विमा शेतकऱ्यांना मिळेल. तसेच अभ्यास करून अद्ययावत आणि सुटसुटीत योजना आणली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतीत पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करून ती परवडेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात विदर्भातील काही गावांचा समावेश करण्यात येईल, असेही ते म्हणाले.