
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 100 टक्के बंदी घातल्यामुळे पीओपी मूर्ती व्यवसायात काम करणाऱ्या हजारो कामगारांपैकी 95 टक्के कामगारांच्या रोजगारावर गदा येणार आहे. मातीच्या मूर्ती घडविण्यास पीओपीच्या तुलनेत अधिक वेळ लागत असल्याने मूर्तींची मागणी पूर्ण करणे मूर्तिकारांना शक्य नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असणाऱ्या व्यवसायाबरोबरच अर्थकारणही कोलमडणार असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
माघी गणेशोत्सवातील मोठ्या मूर्ती अजूनही विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत. हा पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार केला असला तरी ‘पीओपी’ बंदीची सक्ती कायम राहिल्यास मोठा पेच निर्माण होणार आहे. सर्वाधिक मोठा गणेशोत्सव असलेल्या भाद्रपद चतुर्थीच्या सोहळ्यासाठी मार्चपासूनच बुकिंग सुरू होत असल्यामुळे पीओपीपासून मूर्ती बनवणारे मूर्तिकार संकटात सापडले आहेत.
पीओपीच्या मूर्ती कमी कालावधीत साकार होतात, तर शाडू व अन्य घटकांपासून मूर्ती तयार करण्यास जास्त कालावधी लागतो. राज्यात 95 टक्के पीओपी मूर्तींची मागणी आहे. त्यामुळे पालिकेने जागा आणि माती उपलब्ध करून दिली तरी राज्यभरातील गणेशभक्तांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याची हतबलता मूर्तिकारांनी व्यक्त केली.
गुजरातमध्ये बंदी नाही, महाराष्ट्रावर बंदी का?
पीओपीच्या सक्तीमुळे मूर्तिकार, कारागिरांसह गणेशोत्सवासंबंधित छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. यामध्ये फुले, हार विव्रेते, नारळ, मिठाई, दागिने व्यवसायांवरही परिणाम होईल. विशेष म्हणजे गुजरात, हैदराबादला अशा प्रकारची बंदी नसताना मुंबई-महाराष्ट्रातच अशी बंदी का, असा सवाल मूर्तिकार नितीन भालेराव यांनी उपस्थित केला आहे.
न्यायालयात दाद मागणार
हजारो मूर्तिकार आणि कारागिरांचा उदरनिर्वाह मूर्ती कलेवर अवलंबून आहे. शिवाय मोठमोठ्या मूर्ती पीओपीशिवाय बनवण्यासाठी सक्षम पर्यायही उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याची माहिती मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी दिली.
पीओपीला पर्याय द्या!
मातीची एक मूर्ती बनवण्यासाठी 20 ते 22 दिवस लागतात. याच वेळेत पीओपीच्या किमान 25 मूर्ती तयार होतात. त्यामुळे शाडू वापरल्यास मोठ्या प्रमाणात मूर्तींची मागणी पूर्ण करता येणार नाही. यात 95 टक्के मूर्तिकार-कामगार बेरोजगार होतील. आमचा शाडूच्या मातीला विरोध नाही. पीओपीच्या तोडीस तोड मटेरियलचा पर्याय आम्हाला द्यावा. जोपर्यंत पीओपीचा पर्याय देत नाही तोपर्यंत आहे तसे चालू द्यावे, अशी मूर्तिकारांची मागणी असल्याचे श्रीगणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी सांगितले.