खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडला, आठ वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

घराबाहेर खेळत असताना चुकून पाण्याच्या टाकीत पडून एका आठ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. सचिन जनबहादूर वर्मा असे मयत मुलाचे नाव आहे. घाटकोपरमधील पंतनगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पंतनगर येथील शांतीनगर सोसायटीत शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आठ वर्षीय सचिन हा घराबाहेर खेळत होता. खेळताना तो चुकून पाण्याच्या टाकीत पडला आणि बुडाला. मुलाच्या वडिलांनी आणि स्थानिकांनी त्याला तात्काळ बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.