अंधेरीत एअरगनच्या गोळीने श्वान जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

अंधेरी येथील एका सोसायटीमध्ये भटक्या श्वानाला एअरगनने गोळी मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सोसायटीमधील बाल्कनीमधून एअरगनचा वापर करून श्वानाला गोळी मारल्याचे तपासात समोर आले आहे. अंधेरी पश्चिम येथे एक निवासी रहिवासी संकुल आहे. त्या सोसायटीमध्ये गुल्फी नावाची श्वान राहते.

आज पहाटेच्या सुमारास सोसायटीमध्ये काही तरुण बसले होते. त्याना अचानक आवाज आला. त्यानंतर ते एका ठिकाणी गेले. तेथे त्याना गुल्फी जखमी अवस्थेत दिसली. त्यानंतर त्या जखमी गुल्फी श्वानाला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एअरगनची गोळी गुल्फीच्या शरीरात अडकली आहे. त्यामुळे रक्त वाया गेले आहे. या घटनेची माहिती समजताच श्वानप्रेमी संघटनांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.