
येत्या 3 एप्रिल रोजी एमएमसी अर्थात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक होत आहे. उपनगरातील डॉक्टर मतदारांसाठी सांताक्रूझ पूर्वेकडील मुंबई पब्लिक स्कूल, वाकोला मनपा शाळा संकुल, येथे मतदान केंद्र देण्यात आले आहे. परंतु, या ठिकाणी दिवसभर प्रचंड वाहतूक असते. सकाळी आणि दुपारी 3 नंतर मुंगी शिरायलाही जागा नसते. त्यामुळे उपनगरात कमी मतदान होण्याची भीती असून डॉक्टरांमध्येही नाराजी आहे.
शाळेसमोर प्रचंड मोठ्या प्रमाणावर रहदारी आणि वाहतूककोंडी असते. रुग्णालय किंवा क्लिनिकमध्ये जाण्यापूर्वी सकाळी मतदानासाठी जावे तरीही वाहतुकोंडी आणि दुपारी 3 ते 5 दरम्यान मतदानासाठी जावे तरीही वाहतूककोंडी अशा दुहेरी कात्रीत डॉक्टर सापडले आहेत. त्यामुळे मतदार केंद्राबाबत पुनर्विचार करावा आणि मुंबई विद्यापीठात मतदान केंद्र देण्यात यावे अशी मागणी हीलिंग हॅण्ड्स युनिटी पॅनेलसह उपनगरातील डॉक्टरांनी केली आहे अशी माहिती डॉ. तुषार जगताप यांनी दिली. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि वैद्यकीय शिक्षण सचिव धीर कुमार यांना पत्र पाठवण्यात आले आहे.