बँडस्टँडच्या समुद्रात जोडपे पाण्यात वाहून गेले, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला

वांद्रे येथे बँडस्टँडच्या समुद्रात एक तरुण जोडपे पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. मात्र स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ समुद्रात उडी घेत जोडप्याचे प्राण वाचवले. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घनटेची माहिती घेतली. यानंतर जोडप्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

बँडस्टँड येथील ताज लँड्स हॉटेलजवळ दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती आल्याने किनाऱ्यावर बसलेले जोडपे पाण्यात वाहू लागले. जीव वाचवण्यासाठी दोघांचा संघर्ष सुरू होता. यादरम्यान स्थानिक नागरिकांचे वाहून चाललेल्या जोडप्याकडे लक्ष गेले.

स्थानिक तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पाण्यात उड्या घेतल्या. तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करत 15 मिनिटांत जोडप्याला समुद्रातून बाहेर काढले. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे जोडप्याचे प्राण वाचले.