
रस्त्यावरील कार बाजूला घेण्यास सांगितल्याने बस कंडक्टर आणि कारच्या चालकामध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कार चालक आणि बस कंडक्टरमधील भररस्त्यातील राडा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. बस कंडक्टरने कार चालकाला कार बाजूला घेण्यास सांगितले. यामुळे कार चालक संतापला आणि त्याने बस कंडक्टरशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर कार चालकाने कंडक्टरवर हात उगारला आणि धक्के दिले. यानंतर दोघांमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला.
ही सर्व घटना नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भररस्त्यात घडल्या प्रकाराबाबत नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.