
विमान प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उपनगरी रेल्वे मार्गाप्रमाणेच विमानतळावर ‘ब्लॉक’ घेतला जाणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 9 मे रोजी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. मान्सूनच्या आगमनाला दोन महिने उरले आहेत. त्याआधी धावपट्टीच्या देखभालीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी विमान उड्डाणे सहा तास बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने (MIAL) शनिवारी विमान वाहतुकीच्या ‘ब्लॉक’ची घोषणा केली. मुंबई विमानतळावर 9/27 आणि 14/32 अशा दोन धावपट्ट्या आहेत. या धावपट्ट्यांवरून देशांतर्गत आणि विदेशात विमानसेवा सुरु असते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी धावपट्ट्यांच्या देखभालीची कामे केली जातात. यंदा 9 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत दोन्ही धावपट्ट्यांवर देखभालीचे काम करण्यात येणार आहे.
विमानतळ प्राधिकरणाने विमान कंपन्यांना सहा महिन्यांपूर्वीच आगाऊ कल्पना दिली होती. उड्डाणांचे वेळापत्रक बदलण्यासाठी आणि पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विमान कंपन्यांना पुरेसा वेळ देण्यात आला. त्यानंतर आता प्रवाशांना नियोजित ब्लॉकची माहिती देण्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.