राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणात अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मोक्का न्यायालयात तब्बल 4590 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातून सिद्धीकी यांच्या हत्येमागील तीन कारणांचा उलगडा झाला आहे.
गँगस्टर अनमोल बिष्णोई टोळीने सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रचला. सिद्धीकी हे आपल्यापेक्षा वरचढ होण्याच्या शक्यतेने बिष्णोईने त्यांची हत्या घडवून आणल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. अनमोल बिष्णोई हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे अनमोल बिश्नोई टोळीचा सहभाग होता. दहशत निर्माण करण्यासाठी आणि वर्चस्व गाजवण्याच्या हेतूने ही हत्या करण्यात आली होती. गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
आरोपपत्रात अटक केलेल्या 26 जणांची नावे आहेत. तसेच तीन फरार संशयित मोहम्मद यासीन अख्तर (उर्फ सिकंदर), शुभम रामेश्वर लोणकर (उर्फ शुब्बू), आणि अनमोल लविंदर सिंग बिश्नोई (उर्फ भानू) यांचीही नावे आहेत.
आरोपपत्रात खालील तपशीलांचा समावेश
1. एकूण साक्षीदारांची संख्या: 180
2. कलम 180 BNSS: 74 अंतर्गत नोंदवलेली विधाने
3. कलम 183 BNSS: 14 अंतर्गत नोंदवलेली विधाने
4. जप्त केलेली शस्त्रे: 5 बंदुक, 6 मॅगझिन्स आणि 84 राउंड
5. मोबाईल जप्त: 35
6. आरोपपत्राची एकूण पाने: 4,590