
‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था झालेल्या मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराची गाडी आज पुन्हा एकदा ट्रॅकवरून उतरली. पुण्याच्या दिशेने धडधडत निघालेल्या मालगाडीला चुकीचा सिग्नल मिळाल्याने ही गाडी थेट बदलापूर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मवर गेली. सुदैवाने हा प्रकार मोटरमनच्या लक्षात येताच मालगाडी तातडीने थांबवण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी सिग्नलने हा ‘डोळा’ मारल्याने घरी निघालेल्या चाकरमान्यांची मात्र चांगलीच वाट लागली. तब्बल एक तास लोकल सेवा विस्कळीत झाल्याने ठिकठिकाणच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मध्य रेल्वेला शिव्यांच्या लाखोल्या वहात ट्रॅकवर उतरून तंगडतोड करत घर गाठले.
सिग्नलमध्ये बिघाड, पेंटाग्राफ तुटणे, कधी रुळाला तडे अशा नेहमीच्याच घटनांनी मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशातच आज सायंकाळी ऐन गदींच्या वेळी सिग्नलमधील तांत्रिक लोच्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक एक तास ठप्प झाली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या मालगाडीने अंबरनाथ सोडले आणि त्याचवेळी मिळालेल्या सिग्नलप्रमाणे ती गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या रुळावरून जाण्याऐवजी थेट होम प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाली.
सुदैवाने हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखत करकचून ब्रेक दाबले. त्यामुळे ही गाडी होम प्लॅटफॉर्मवर एक तासाहून अधिक काळ लटकली. मात्र यामुळे कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल सेवा ठप्प झाली. हा गोंधळ पीक अवरला सायंकाळी घडल्याने मुंबई, ठाण्याहून नोकरी, व्यवसाय करून घरी परतणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक लोकल गाड्या रद्द केल्याने ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
दरम्यान संतप्त झालेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत ‘मरे’च्या रोजच्याच रडगाण्याचा वीट आल्याचे सांगितले. आजची घटना सिग्नलमधील बिघाड की अधिकाऱ्यांच्या चुकीने घडली, असा सवाल केला जात असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
कर्जत, खोपोली लोकल रद्द
अंबरनाथहून मुंबईकडे जाणारा अप मार्ग सुरळीत करण्यासाठी कर्जत, खोपोलीत तसेच बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल रद्द करून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे वळवण्यात आल्या आहेत. मात्र या लोच्याचा फटका बदलापूर-खोपोलीदरम्यानच्या प्रवाशांना बसला. अनेकांनी ट्रॅकवरून चालत महामार्ग गाठला आणि तेथून खासगी वाहनाने पुढील प्रवास केला.