शिवसेनेच्या बदनामी प्रकरणी ‘फशिव सेना’ सोशल मीडिया अकाऊंटविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना पक्ष, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांबद्दल सातत्याने सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर, मॉर्फ केलेले फोटो-व्हिडिओ आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या ‘फशिव सेना’ नावाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स अकाऊंटविरोधात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही गंभीर बाब विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केली होती. त्यानंतर मंगळवारी शिवसेना सचिव अ‍ॅड. साईनाथ दुर्गे यांच्या तक्रारीवरून संबंधित सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रार दाखल करताना अ‍ॅड. कपिल झोडगे, वांद्रे विधानसभा समन्वयक आणि माजी नगरसेवक शेखर वायंगणकर, शाखाप्रमुख वसंत गावडे, संदीप शिवलकर, मयूर कांबळे आणि परशुराम तपासे हे उपस्थित होते.

पेज चालवण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांचाही शोध घेणार

‘फशिव सेना’ या पेजवरून शिवसेना नेत्यांविरोधात दिशाभूल करणारी आणि समाजात द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट सातत्याने प्रसारित केल्या जात होत्या. याची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच हे पेज चालवण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.