
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पारा 40 अंशांवर गेल्याने प्रचंड उकाड्यामुळे जिवाची काहिली होत असल्यामुळे पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील प्राणी-पक्ष्यांना ‘गारेगार मेजवानी’ दिली जात आहे. यामध्ये अस्वलाला खास फ्रूट आईस केक, हरीण-माकडांना रसरशीत कलिंगड, ऊस, फळं-भाज्या दिल्या जात असून वाघोबा उन्हापासून बचाव करण्यासाठी थंडगार पाण्यात डुबकी मारताना दिसत आहे. ऋतुमान बदलानुसार त्यांच्या आहारात बदल केला असल्याचे जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी सांगितले.
असे आहे आकर्षण
या ठिकाणी सध्या 40 हरणे, 20 ते 25 माकडे, अस्वल, दोन बिबटे, दोन वाघ, दोन तरस, चार कोल्हे, शेकडो प्रकारचे पक्षी, कासव, साप, मगर असे प्राणी आहेत. ‘गारेगार मेजवानी’चा आस्वाद घेताना प्राण्यांना पाहून पर्यटकांचेही मनोरंजन होते.
अशी घेतली जातेय काळजी
प्राण्यांना देण्यात येणारी फळे थंड करून देण्यात येत आहेत. शिवाय विविध प्रकारच्या फळांचा थंडगार फ्रूट केकही दिला जात आहे. नैसर्गिक अधिवासाप्रमाणे प्राण्यांना गुहा, डबकी, झुडपे तयार करण्यात आली आहेत.
डबक्यातील पाणी प्रवाही असल्याने स्वच्छ आणि थंडावा मिळत आहे. पक्ष्यांसाठीही भाजलेले चणे, शेंगदाणे, चिकू, पेरू, भोपळा, मध, गाजर अशी फळे दिली जात आहेत. हरणांसाठी हिरवा पाला, कलिंगड टांगून ठेवण्यात येत आहेत.