Mumbai News – आधी फेसबुक लाईव्ह करुन आपबीती सांगितली, मग CA ने जीवनयात्राच संपवली

मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका CA असलेल्या तरुणाने गळफास घेत आपले आयुष्य संपवले. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली. तरुणाने आधी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्याने एक तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. संदीप पासवान असे मयत तरुणाचे नाव आहे.

संदीप हा मूळचा झारखंडचा असून तो मुंबईतील चेंबूर परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. संदीप पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट होता. 2018 मध्ये संदीपला मुंबईत राहणाऱ्या सपना पासवान हिचे लग्नासाठी स्थळ आले होते. तेव्हा त्यांची पहिली भेट झाली.

हळू-हळू संदीप आणि सपनामध्ये जवळीक वाढू लागली. दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. त्यानंतर 2021 मध्ये सपनाने संदीपकडे फ्लॅट घेण्यासाठी 12.5 लाख रुपये मागितले. मात्र संदीपला वेगळा संशय आला म्हणून त्याने पैसे परत मागितले. पैसे परत देण्याच्या बहाण्याने सपनाच्या घरच्यांनी त्याला 14 जून 2023 रोजी घरी बोलावले.

संदीपला मुंबईला आल्यानंतर सपनाच्या कुटुंबीयांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर नेहरु नगर पोलीस ठाण्यात छेडछाड प्रकरणी फिर्याद दाखल केली. याप्रकरणी संदीपने आपले बँक स्टेटमेंट आणि अन्य कागदपत्रे सादर केले. तसेच हजारीबाग कोर्टात सपना आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. मात्र मुंबई पोलिसांनी हे घरगुती प्रकरण असल्याचे सांगत तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप संदीपने केला आहे.

सपनाच्या घरच्यांकडून संदीपला तक्रार मागे घेण्यासाठी आणि पैसे परत न करण्यासाठी धमक्या सुरूच होत्या. अखेर मंगळवारी सकाळी संदीपने आपल्या चेंबूरस्थित फ्लॅटमध्ये फेसबुक लाईव्ह करत आपली आपबीती सांगितली. तसेच सपनाच्या घरच्यांनी आपल्याला मारहाण करत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप संदीपने केला.

संदीपचा व्हिडिओ पाहून नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस संदीपच्या फ्लॅटवर पोहचले तेव्हा संदीपने गळफास घेत जीवन संपवले होते.