कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणातील सहा आरोपींना उच्च न्यायालयाने आज प्रत्येकी 25 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बड्डी, भरत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या आरोपींना न्या. अनिल किल्लोर यांच्या एकल पीठाने जामीन मंजूर केला. 2018-19 मध्ये या आरोपींना अटक झाली आहे. आरोपी विरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्र सुनावणी घेतली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
गोळ्या झाडून हत्या
16 फेब्रुवारी 2015 रोजी ही घटना घडली. पानसरे हे मार्ंनग वॉक करत असताना दोघे जण दुचाकीवरून आले व त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. स्थानिक पोलीस, नंतर विशेष पथक व अखेर एटीएसकडे याचा तपास सोपवण्यात आला. जामिनासाठी या आरोपींनी स्वतंत्र याचिका केल्या होत्या. या याचिकांना कॉम्रेड पानसरे यांची सून स्मिता पानसरे यांनी विरोध केला. या आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली नाही.
- पुराव्यांशी छेडछाड करू नये, साक्षीदारांना धमकावू नये, खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहावे यासह अन्य अटी न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातल्या आहेत.
खटला रेंगाळला
गेली पाच ते सहा वर्षे आरोपी कारागृहात आहेत. या खटल्यात एकूण 130 साक्षीदार आहेत. आतापर्यंत 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाली आहे. खटल्याची प्रगती समाधानकारक नाही. भविष्यात खटला कधी पूर्ण होईल याची शाश्वती नाही, असा ठपका न्यायालयाने जामीन मंजूर करताना ठेवला.