अल्पवयीन मुली, तरुणींचा पाठलाग करण्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. केवळ एकदा मुलीच्या मागोमाग जाणे हा मुलीचा पाठलाग केल्याचा गुन्हा ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी दिला आहे.
पाठलाग केल्याच्या गुन्ह्यात दोषी सिद्ध होण्यासाठी आरोपीने वारंवार ते कृत्य केले असले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. एका बलात्काराच्या घटनेत निकाल देताना न्यायालयाने भारतीय दंड संहितेचे कलम 354(ड) अंतर्गत पाठलाग केल्याच्या गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण?
जानेवारी 2020 मध्ये मुख्य आरोपी पीडित मुलीच्या मागे जात तिच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पीडितेने आरोपीला लग्नासाठी नकार दिला होता. पीडितेच्या कुटुंबीयांनीही आरोपीच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. मात्र आरोपीने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले होते. यानंतर 26 ऑगस्ट 2020 रोजी आरोपीने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
अत्याचाराची घटना घडली तेव्हा आरोपीचा साथीदार त्याच्या घराबाहेर होता. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने विविध कलमांखाली दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. तर पाठलाग केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तसेच पीडितेच्या जबाबात दुसऱ्या आरोपीचा विशिष्ट सहभाग उघड झाला नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती सानप यांनी दुसऱ्या आरोपीची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले.