कुलाबा येथील ससून डॉक परिसरातील समुद्रात एका 23 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून तो तरुण बेपत्ता होता. याप्रकरणी कुलाबा पोलीसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करीत आहेत. सुनीलकुमार हरलालसिंग असे त्या मृत तरुणाचे नाव होते. तो एका बार्जवर खलाशी म्हणून कामाला होता. सुनील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. तो कुठेही दिसून न आल्याने त्याच्या सहकाऱयांनी यलोगेट पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. पण आज त्याचा ससून डॉक येथील समुद्रात मृतदेह सापडला. सुनीलने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात झाला ते अद्याप समजू शकले नाही. परंतु समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करीत आहेत. सुनील हा मूळचा राजस्थानच्या सबलापुरा येथील रहिवासी होता.