
राम ही दोन अक्षरे ज्यांचा श्वास आहे, ज्यांच्या मनात आणि शरीरावर राम आहे, अशा छत्तीसगढच्या रामनामी पंथांचा अनोखा भक्तीभाव दर्शवणारे छायाचित्र प्रदर्शन सध्या वरळी स्नोबॉल स्टुडियोजमध्ये सुरू आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक – डिझायनर, छायाचित्रकार भूपाल रामनाथकर यांच्या कॅमेऱ्याने ‘रामनामी’चा भक्तीभाव टिपला आहे. ‘राम’ असे या प्रदर्शनाचे नाव असून ते उद्यापर्यंत रसिकांसाठी खुले आहे.
रामनामी हा छत्तीसगढचा पंथ आहे. 19व्या शतकात मंदिरात पूजा करण्यापासून रोखले, तेव्हापासून या पंथाच्या लोकांनी अवघ्या देहावर राम गोंदून घेतले. त्यांचे अवघे शरीरच मंदिर बनले. खरं तर याची सुरुवात 1890 पासून जांगजीर चांपा जिह्यातील चारपोरा गावातून झाली. संत परशुराम यांनी रामनामी पंथाची स्थापना केली. या पंथाचे लोक अगदी दोन वर्षांचे असल्यापासून राम गोंदवून घेतात. मोठे झाल्यावर ते चेहरा, छातीसह अंगभर राम गोंदवतात.
अद्भुत पंथ
रामनामी भक्तीपंथांची पाच प्रतिकं आहेत. जैतखांब म्हणजे खांबाला सफेद रंग देऊन त्यावर राम लिहिणे, वस्त्रावर रामनाम, मोर मुकुट, संपूर्ण शरीरावर रामनामाचे गोंदण आणि नृत्य करताना पायात घुंगरू. भूपाल रामनाथकर यांच्या फोटो प्रदर्शनातून या अद्भुत पंथाविषयी जाणून घेता येते.
तेजस ठाकरे यांची प्रदर्शनाला भेट
भूपाल रामनाथकर यांनी रामनामींच्या घराला भेट दिली. रामनामींच्या भक्तीभावाने ते थक्क झाले. त्यांनी यामागचा भाव समजून घेतला आणि कॅमेऱ्यात कैद केला. ही अद्भुत छायाचित्रं पाहणे ही कलारसिकांसाठी पर्वणी आहे. तेजस ठाकरे यांनी सोमवारी राम प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींचे कौतुक केले.
आधुनिकीकरण आणि स्थलांतर यामुळे आजच्या काळात रामनामींची संख्या कमी होत आहे. अंगभर रामनामाचा टॅटू असलेले जेमतेम शंभर रामनामी आज हयात असतील. त्यांचा भक्तीभाव थक्क करणारा आहे, असे भूपाल रामनाथकर म्हणाले.