
अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून धारावीकरांना मुंबईतून विस्थापित करण्याचा कट रचण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत धारावीकर धारावीतून मुंबई बाहेर जाणार नाही. सरकारचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष वामन मेश्राम यांनी राज्य सरकारला दिला.
भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या नेतृत्वाखाली बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांनी धारावीत जेल भरो आंदोलन केले. धारावीतील 90 फूट रस्ता ते धारावी पोलीस ठाणे अशा करण्यात आलेल्या आंदोलनात हजारो धारावीकर सहभागी झाले होते.
दरम्यान, अदानीच्या हातून धारावी वाचवण्याबरोबर ईव्हीएम हटावो, ओबीसीची जातगणना झाली पाहिजे, वक्फ बोर्ड, महाबोधी महाविहार बचाव या इतर मागण्याही आंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी बहुजन मुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल माने, प्रेम गुप्ता, उल्हास सोनावणे, रवी शेजवळ, संतोष विश्वकर्मा, विद्या त्रिरत्ने, कांबळे, अशोक मरचंडे, श्रीकांत सरवदे, मेहताब शेख, अस्लमभाई, कलामभाई, जावेदभाई यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.