बेस्टच्या विद्युत विभागातील पदे भरली नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, बेस्ट कामगार सेनेची आक्रमक भूमिका

बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तत्काळ कर्मचारी भरती करा अन्यथा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा बेस्ट कामगार सेनेने दिला आहे. शनिवारी विद्युत पुरवठा विभागातील एका कर्मचाऱयाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. हा बेस्टमधील भ्रष्ट कारभाराचाच बळी असल्याचा दावा करीत बेस्ट कामगार सेनेने प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

जेकब सर्कल येथील बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील विद्युत बिल भरणा केंद्रावर कार्यरत असताना राजेश म्हात्रे या कर्मचाऱयाचा शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विद्युत पुरवठा विभागातील रिक्त पदे अद्याप न भरल्याचा हा परिणाम आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार सेनेने बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱयांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. विद्युत पुरवठा विभागात एमईआरसी नियमानुसार एआरआरमध्ये तत्काळ कर्मचारी भरती करण्यासाठी बेस्ट कामगार सेना मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. त्यावर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मान्यता देऊन तत्काळ कर्मचारी भरती करण्याचे लेखी पत्र बेस्ट महाव्यवस्थापकांना दिले होते. त्यानंतरही रिक्त पदे भरलेली नाहीत. आता 30 एप्रिलपर्यंत प्रशासनाने सर्व पदे न भरल्यास 1 मेपासून महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त बेस्टच्या भ्रष्ट अधिकाऱयांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिला आहे.

बेस्टमध्ये काही अधिकारी फक्त स्वतःचे प्रमोशन करून घेत आहेत. कामाचा शून्य अभ्यास असल्याने त्यांना बेस्टच्या हिताचे निर्णय घेता येत नाहीत. या माध्यमातून बेस्ट उपक्रम बंद करण्याचाच राज्य सरकार आणि बेस्टच्या काही अधिकाऱ्यांचा डाव आहे. बेस्ट वाचवण्यासाठी उच्च पदावर कर्तबगार अधिकाऱयांची आवश्यकता आहे. – सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना

महाव्यवस्थापक दालनातून एमएमआरडीएचा कारभार

बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार सध्या एस. श्रीनिवास यांच्याकडे आहे. मात्र त्यांनी बेस्टच्या हितासाठी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. त्यांचे बेस्ट उपक्रमाकडे लक्ष नाही. ते एमएमआरडीएचा संपूर्ण कारभार बेस्टचे दालन आणि कर्मचारी घेऊन करीत आहेत, असा आरोप बेस्ट कामगार सेनेने केला आहे. याच वेळी बिनकामाच्या अधिकाऱयांना सावधानतेचा इशारा दिला आहे.