
<<< मंगेश मोरे >>>
मुंबईकरांची जीवनवाहिनी ‘बेस्ट’ची बस सेवा मिंधे-भाजप सरकारच्या काळात तोटा आणि कर्जाच्या खाईत लोटली गेली आहे. मागील दोन वर्षांत बेस्टच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. विविध बँकांकडून घेतलेली कर्जे तसेच देणींचा आकडा तब्बल 10475.85 कोटींच्या घरात गेला आहे.
दीडशे वर्षांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या बेस्टची बस सेवा मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी. शिवसेनेने आपल्या सरकारच्या काळात बेस्टच्या सेवेत उत्तरोत्तर सुधारणा केली. मात्र मिंधे-भाजपच्या काळात बेस्टची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली. मुंबईची शान असलेल्या बेस्टला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी विविध बँकांपुढे हात पसरावे लागले. बस सेवेचे योग्य व्यवस्थापन ठेवण्यात मिंधे सरकार सपशेल अपयशी ठरल्याने बेस्टच्या डोक्यावरील कर्ज आणि देणींचा आकडा 10,475.85 कोटींवर गेला आहे. तसेच आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये संचित तोटा 3999.73 कोटींवर पोहोचला आहे. 15 जानेवारी 2025 पर्यंतची ही धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे.
- वाढते कर्ज आणि वाढत्या संचित तोट्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बेस्टने विविध बँकांकडून घेतलेले अल्पमुदतीचे कर्ज 608.33 कोटींच्या घरात आहे.
- थकीत कर्ज तसेच आजी-माजी कर्मचारी, कंत्राटदार व पुरवठादारांचे देणे या सर्वांची एकूण रक्कम 10,475.85 कोटी रुपये आहे.
- बेस्ट प्रशासनाने उच्च न्यायालयात यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले असून कोलमडलेली आर्थिक घडी पूर्वपदावर कधी येईल, हे सांगणे मुश्कील असल्याची हतबलता बेस्ट प्रशासनाने व्यक्त केली आहे.
बेस्टची सध्याची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आणि वेदनादायी आहे, याला सरकारची उदासीनताच जबाबदार आहे. बेस्ट बस सेवा ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्याची जबाबदारी सरकारने निभावलीच पाहिजे, असे बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत म्हणाले.
चिंता वाढवणारी आकडेवारी (रक्कम कोटींमध्ये)
- विविध बँकांकडून घेतलेली कर्जे तसेच टाटा पॉवरची देयके – 2540.27
- आजी-माजी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व इतर अंतिम देयके – 1867.40
- ‘व्हेंडर्स’ची थकीत रक्कम/टाटा पॉवरचे बिल – 356.20