बेस्ट बसेसचे नेटवर्क ‘गुगल मॅप्स’शी जोडणार, बस येण्याची अचूक वेळ कळणार

‘मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’च्या बसेसचे वेळापत्रक सध्या कोलमडलेले असते. बसच्या प्रतीक्षेत मुंबईकरांचा बराच वेळ वाया जातो. ही गैरसोय दूर करण्यासाठी बेस्ट उपक्रम लवकरच बसेसचे नेटवर्क ‘गुगल मॅप्स’शी जोडणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील बेस्ट बसच्या आगमनाची अचूक वेळ कळणार आहे. तसेच दोन बसेसमधील वेळेचे अंतर कमी होणार असून प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुसरी बस येणार आहे.

बेस्टच्या बसेस ‘गुगल मॅप्स’शी जोडल्या जाणार असल्यामुळे प्रवाशांना बसच्या वेळेचा अंदाज घेऊन प्रसंगी मेट्रो, रेल्वे किंवा टॅक्सीसारख्या पर्यायांचा आधार घेता येणार आहे. गुगलसोबत अनेक बैठका झाल्या असून महिनाभरात ही सेवा सुरू होईल आणि मुंबईकरांना बसच्या अचूक वेळेचा अंदाज घेत प्रवासाचे नियोजन करता येईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक एसव्हीआर श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारने सार्वजनिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करण्यासाठी गुगलसोबत सामंजस्य करार केला होता. त्या करारानुसार गुगल मॅप्सशी बेस्टचे नेटवर्क जोडल्यानंतर प्रवाशांना गुगल मॅप्समध्ये त्यांचे सध्याचे स्थान आणि गंतव्य स्थान नोंदवल्यानंतर बेस्ट बसेसचे अपडेट मिळणार आहेत. सध्या प्रवाशांना एक बस गेल्यानंतर दुसऱया बससाठी 35 ते 40 मिनिटांची प्रतीक्षा करावी लागते. हा प्रतीक्षा कालावधी 15 ते 20 मिनिटांपर्यंत कमी करण्याच्या दृष्टीने बेस्ट बसेसची संख्या वाढवण्याची कार्यवाही सुरू आहे.

प्रवाशांना हा होणार फायदा

शहरातील बेस्टच्या एकूण 402 बस मार्गांवर जवळपास 2900 बसेस धावतात. बेस्ट बसेसचे नेटवर्क ‘गुगल मॅप्स’शी जोडले गेल्यानंतर प्रवासी कोणती बस कुठल्या ठिकाणी आहे हे सहज ट्रक करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा बसच्या प्रतीक्षेत वाया जाणारा बराच वेळ वाचणार आहे.