शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत 52 विद्यार्थी विजेते, 500 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेतलेल्या महापौर आयोजित ‘माझी मुंबई’या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ बालचित्रकला स्पर्धेत 52 विद्यार्थी विजेते ठरले, तर 500 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली. मुंबईतील 48 ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये 88 हजार 789 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी घोषित केला.

मुंबई महापालिका मुख्यालयात पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेतून उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी सविस्तर निकालाची घोषणा केली. शिक्षणाधिकारी राजेश पंकाळ, सुजाता खरे, कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. ही चित्रकला स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली होती. इयत्ता पहिली व दुसरीच्या गटासाठी ‘मी आणि फुलपाखरू’, ‘मी आजीच्या कुशीत’, ‘मी व माझा मित्र/मैत्रिण’, इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटासाठी ‘आम्ही पतंग उडवतो’, ‘आम्ही अभ्यास करतो’, ‘आम्ही राणीच्या बागेत’ यासह इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषय होते.

n प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱया विद्यार्थ्यांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार आणि 15 हजार रुपये रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक गटात 10 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. चारही गटांत मिळून 6 लाख 90 हजार रुपयांची पारितोषिके आहेत.