
मुंबईच्या नालेसफाईला मंगळवार, 25 मार्चपासून सुरुवात होणार असून यात पारदर्शकता आणण्यासाठी या वर्षीपासून नालेसफाईच्या कामांवर ‘एआय’चा वॉच राहणार आहे. त्याचबरोबर छायाचित्रांसोबत 30 सेकंदांचे चित्रीकरण तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व चित्रीकरणांचे विश्लेषण करण्यासाठी ‘एआय’चा वापर केला जाणार आहे. नालेसफाईच्या वेळी प्रत्यक्ष कार्यस्थळी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात मिठी नदीतील नालेसफाईचे कार्यादेश देण्यात येणार आहेत.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढते, तर लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर (वॉर्ड) असते. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होतो. प्रत्येक वर्षी नाल्यांमधून किती गाळ काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून उद्दिष्ट निश्चित केले जाते. त्यानुसार मुंबईतील नालेसफाईसाठी छोट्या आणि मोठ्या नाल्यातील सफाईसाठी मागवलेल्या निविदांची छाननी पूर्ण झाली असून शहर आणि उपनगरांसाठी 23 कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत.
तीन टप्प्यांत केली जाते सफाई
दरवर्षी नाल्यांमध्ये साचणारा गाळ हा वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी सर्वाधिक गाळ उपसा केला जातो. यानुसार या वर्षी एप्रिल व मे 2025 या दोन महिन्यांत नाल्यांमधील एकूण गाळाच्या 80 टक्के गाळ काढण्यात येईल, तर पावसाळ्यादरम्यान 10 टक्के आणि पावसाळ्यानंतर उर्वरित 10 टक्के गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नोंदी करणे आवश्यक
दररोज नाल्यांमधून काढलेला गाळ ठेवण्याची जागा, गाळ भरण्यापूर्वी रिकामा असलेला डंपर, डंपरमध्ये गाळ भरल्यानंतरचे दृश्य, गाळ भरलेले वाहन क्षेपणभूमीवर जाण्यापूर्वी वजन काट्यावर केलेल्या वजनाची कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच फेरफार करायला वाव न देता थेट प्रणाली (सॉफ्टवेअर) मध्ये होणारी नोंद, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर पोहोचलेल्या वाहनांची माहिती, त्या वाहनांचे क्रमांक आणि वेळ यांची नोंद करणे आवश्यक असेल. समवेत क्षेपणभूमीवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे.
या गोष्टी कंत्राटदाराला बंधनकारक
कामाच्या तीन टप्प्यांत-(1) काम सुरू होण्यापूर्वी, (2) प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि (3) काम पूर्ण झाल्यानंतर-दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ-टॅग) यासह चित्रफीत आणि छायाचित्रे तयार करून ती संबंधित सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना अनिवार्य असेल.