पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याला केलेली शिवीगाळ शांतता भंगाचा गुन्हा नाही; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्वाळा

सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या जोगेश्वरीतील व्यक्तीला सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याचा आरोप होता. तथापि, पोलीस ठाण्यात अधिकार्‍याला केलेली शिवीगाळ हा जाणूनबुजून अपमान केल्याचा व त्यातून सार्वजनिक शांतता भंग झाल्याचा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश तुषार आगलावे यांनी एका प्रकरणात दिला. याचवेळी सबळ पुराव्यांचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपी मोहम्मद अब्बास झाकीर हुसैन रिझवी याची निर्दोष सुटका केली.

जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी पोलीस ठाण्यात 13 वर्षांपूर्वी, जानेवारी 2012 मध्ये ही घटना घडली होती. आरोपीच्या बहिणीचा दुसर्‍या एका गुन्ह्यात अतिरिक्त जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी तिला बोलावले होते. तिने जबाब नोंदवताना दागिन्यांचा उगाच उल्लेख केला, असे म्हणत आरोपीने तिच्याशी पोलीस ठाण्यात वादावादी सुरू केली. नंतर त्या जबाबाचा कागद फाटला होता. याचदरम्यान आरोपीने शासकीय कर्तव्यात अडथळा आणत पोलीस अधिकार्‍याशी बाचाबाची केली तसेच शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप सरकारी पक्षाने न्यायालयात केला होता. मात्र हा आरोप न्यायालयाने धुडकावला.

कथित प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारात व पोलीस कर्मचार्‍यांच्या हजेरीत घडला आहे. त्यामुळे जाणूनबुजून अपमान करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्हा उद्भवत नाही. आरोपीने पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे कृत्य अत्यंत शंकास्पद आहे. या प्रकरणात आरोपीचे दोषत्व सर्व संशयांच्या पलीकडे जाऊन सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने आरोपीच्या निर्दोष सुटकेचा आदेश दिला.