घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, फरार व्यावसायिकाला 7 महिन्यांनी अटक

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी फरार असलेल्या अर्शद खानला मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेश येथून अटक केली. पोलिसांनी अर्शदला चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र तो चौकशीसाठी येत नव्हता. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपर येथील होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले. त्यात 17 जणांचा बळी गेला होता, तर 50हून अधिक जण जखमी झाले होते. होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. इगो मीडिया कंपनीचे संचालक भावेश भिंडे, कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे, सागर पाटील आणि स्ट्रक्चरल अभियंता मनोज संघूलादेखील पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या विरोधात पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

2021 आणि 2022मध्ये इगो मीडियाने 10 बँक खात्यांमधील 39 व्यवहारांमध्ये 46.50 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. ते पैसे अर्शद खानपर्यंत पोहचले होते. तपासादरम्यान पोलिसांनी अर्शदला चौकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र तो चौकशीसाठी येत नव्हता.