एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम परीक्षा संपल्यानंतर सुरू करा! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जुना झालेला एलफिन्स्टन पूल तोडला जाणार आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर हे तोडकाम केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर तोडकाम सुरू करावे, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेला वरळी-शिवडी कनेक्टर हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. एलफिन्स्टन पूल पाडणे हा या प्रकल्पाचाच भाग आहे. एलफिन्स्टन पुलाचे तोडकाम फेब्रुवारीत सुरू करण्याची सरकारची योजना आहे; परंतु पूल पाडल्यानंतर त्या भागात वाहतुकीची कोंडी होऊन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे तोडकाम परीक्षा संपल्यानंतर करण्यात यावे, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे. वरळी-शिवडी कनेक्टरचे प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.