Elphinstone Bridge : ऐन परीक्षेच्या काळात एल्फिन्स्टन पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची होणार गैरसोय, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) फेब्रुवारीच्या अखेरीस पाडला जाणार आहे. ऐन परीक्षेच्या काळात हा पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते, याचबाबत चिंता व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ”महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेला वरळी-शिवडी कनेक्टर हा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये या प्रकल्पाचे काम संथ गतीने चालू आहे. सदर प्रकल्पाचाच एक भाग असलेला एल्फिन्स्टन पूल फेब्रुवारी महिन्यात पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे समजते. सदर पूल पाडल्यानंतर या भागात वाहतूक कोंडी होऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. तरी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ लक्षात घेऊन पूल पाडण्याचे काम परीक्षेच्या काळानंतर करण्यात यावे.”

त्यांनी पत्रात पुढे लिहिलं की, ”वरळी शिवडी कनेक्टरचे इतर काम प्रलंबित न ठेवता, वरळी शिवडी कनेक्टर लवकरात लवकर पूर्ण होईल याची काळजी घेतली जावी, ही विनंती.”