म्हाडाच्या 95 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक, पावसाळ्यापूर्वी घरे रिक्त करण्यासाठी भाडेकरूंना नोटीस देणार

म्हाडाच्या दक्षिण मुंबईतील 95 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असून त्यातील हजारो कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळ्यापूर्वी या अतिधोकादायक इमारती रिक्त कराव्यात म्हणून म्हाडाकडून संबंधित रहिवाशांना 77 (ब) अंतर्गत इशारा नोटीस दिल्या जाणार आहेत. रहिवाशांना संक्रमण शिबीर हवे असल्यास त्यांना वॉर्ड स्तरावर त्यासाठी म्हाडाकडे अर्ज करावा लागणार आहे.

मुंबईत सध्या 13 हजारहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्या 80 ते 100 वर्षे जुन्या आहेत. या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून केली जाते. यातील अनेक इमारती जीर्णावस्थेत असून दुरुस्तीपलीकडे गेल्या आहेत. उपकरप्राप्त इमारतींचे नव्याने संरचनात्मक सल्लागार यांची नियुक्ती करून पुढील वर्षभरात स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना फेब्रुवारीत म्हाडा उपाध्यक्षांनी दिल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत 540 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले आहे. त्यापैकी 500 इमारतींचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामधील 95 इमारती सी-1 म्हणजे अतिधोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे.

128 इमारती दुरुस्तीसाठी रिक्त कराव्या लागणार

स्ट्रक्टरल ऑडिट रिपोर्टप्रमाणे 128 इमारती सी – 2 (अ) श्रेणीतील आहेत म्हणजेच या इमारती रिक्त करून त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. 279 इमारती सी – 2 (ब) श्रेणीतील असून रिकाम्या न करता दुरुस्ती करावी लागणार आहे. तर 34 इमारतींची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे.

…तर म्हाडा स्वतः पुनर्विकास करणार

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये एखादी इमारत अतिधोकादायक आढळल्यास संबंधित इमारतीच्या मालकाला 79 अ नुसार सहा महिन्यांत पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्याबाबत नोटीस दिली जाते. मालकाने या कालावधीत पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर न केल्यास रहिवाशांना पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. मालक आणि रहिवाशांनी पुनर्विकासाचा प्रस्ताव न दिल्यास म्हाडा स्वतःच पुनर्विकास करू शकते.