
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाच्या उन्हाळी सुट्टीत एसटीच्या 764 नवीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी हंगाम कालावधीत प्रवासी गर्दी होणाऱ्या मार्गावर 15 एप्रिलपासून जादा फेऱ्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून मुंबईतील चाकरमान्यांना या फेऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.
यंदा उन्हाळी कालावधीत दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत एसटीमार्फत नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात; परंतु सुट्टीच्या कालावधीत परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेसची मागणी वाढते. त्यासाठी शालेय फेऱ्या रद्द करून लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात. त्याच अनुषंगाने उन्हाळी हंगामासाठी मध्यवर्ती कार्यालयामार्फत राज्यातील विविध मार्गांवर 764 जादा फेऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या जादा फेऱ्यांद्वारे दैनंदिन 521 नियतांद्वारे 2.50 लाख किमी चालविण्यात येणार आहे. जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.