
गुंतवणुकीवर जास्त पैशाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीशी संबंधित आठ आरोपींविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज सत्र न्यायालयात 27,147 पानांचे आरोपपत्र दाखल केले. सुमारे 14 हजार गुंतवणूकदारांची 142 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
टोरेस ब्रँडची मालकी असलेली मेसर्स प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड, तसेच तानिया ऊर्फ तझागुल क्सस्तोवा, व्हॅलेंटिना गणेश कुमार, सर्वेश सुर्वे, अल्पेश खारा, तौसिफ रियाझ, आर्मेन एटियान आणि लल्लन सिंग यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून दोषींविरोधातील आरोप गंभीर असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 14,157 लोकांना टोरेस ब्रँड अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांना 142.58 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स कायदा आणि अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टोरेस कार्यालयात चोरीचा प्रयत्न
टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गावदेवी येथील सीलबंद केलेल्या टोरेसच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.