मुंबईतील एका फूड स्टॉल अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. चायनीज भेळ बनवताना फूड ग्राइंडरमध्ये अडकून एका 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. सूरज नारायण यादव असे मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मयत सूरज हा मूळचा झारखंडचा असून, काही महिन्यांपासून सचिन कोठेकर यांच्या फूड स्टॉलवर काम करत होता. सूरज हा इंडस्ट्रियल फूड ग्राइंडर चालवत होता. फूड ग्राइंडरमध्ये मंचुरियन आणि चायनीज भेळचे साहित्य तयार करत असताना सूरजचा शर्ट मशिनमध्ये अकडल्याने तो आत खेचला गेला आणि ही दुर्घटना घडली.
सूरजला तात्काळ केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी फूड स्टॉलचे मालक सचिन कोठेकर यांच्याविरोधात निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरजला ग्राइंडर चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. सूरजच्या मृत्यूमुळे छोट्या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.