गुरुवारपर्यंत कसारा घाट बंद

मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटाची दुरुस्ती आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे गुरुवार 27 फेब्रुवारीपर्यंत कसारा घाट सकाळी 6 ते सायंकाळी 6 या दरम्यान वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच 3 ते 6 मार्चपर्यंतही हा घाट बंद राहणार आहे. डागडुजीच्या कामासाठी सहा दिवसांचा ट्रफिक ब्लॉक घेण्यात आला असून अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही कामे वेळेत पूर्ण केली जाणार आहेत.

पोलिसांची भर उन्हात ‘परीक्षा’

नव्या घाटात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस डय़ुटी करीत असून 37 डिग्री एवढे तापमान सध्या आहे. त्यामुळे एक प्रकारे भर उन्हात पोलिसांची जणू ‘परीक्षा’च सुरू आहे.

  • अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घातली असून काही वाहने कसारा बायपास येथे थांबवून ठेवण्यात आली. या ट्रफिक ब्लॉकमुळे खोडाळा, विहीगाव, जव्हार, मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटणदेवी मंदिरमार्गे नवीन कसारा घाटातून वळवली आहे.
  • आज सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत, महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी छाया कांबळे, राम होंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनची टीमदेखील तैनात आहे.
  • जुन्या कसारा घाटातील दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात वाहनचालकांना विनाअडथळा प्रवास करता येईल. दरम्यान नाशिककडे नवीन घाटातून जाताना वेगावर नियंत्रण ठेवावे, ओव्हरटेक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.