स्वच्छ-सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिका आता प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करणार आहे. यामध्ये सोमवारपासून एक आठवडा मुंबईभरात जनजागृती करण्यात येणार असून त्याच्या पुढील सोमवारपासून कारवाईचा धडाका सुरू होईल. त्यामुळे एका आठवड्यात प्लॅस्टिक पिशवी वापरणे बंद केले नाही तर पाच हजारांचा दंड भरावा लागणार आहे. नियम मोडणारे फेरीवाले, दुकानदार, साठवणूक करणाऱ्यांसह ग्राहकांनाही हा दंड भरावा लागणार आहे.
मुंबईत 26 जुलै 2005 कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले होते. या महापुराला प्लॅस्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याचे समोर आले. त्यामुळे 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. यावेळी प्रचंड मोठय़ा प्रमाणात पालिकेने जनजागृती केल्यामुळे मुंबईकरांनी पालिकेच्या आवाहनाला साथ देत प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद केले होते. मात्र कालांतराने कारवाई थंडावल्याने मुंबईभरात बेमालूमपणे प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे.
पंचवीस हजारांपर्यंत दंड
पहिल्या गुह्याला – पाच हजार रुपये
दुसऱ्या गुह्याला – दहा हजार रुपये
तिसऱ्या गुह्याला – 25 हजारांचा दंड
दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई
…म्हणूनच थंडावली होती कारवाई
पालिकेकडे प्लॅस्टिकबंदीविरोधात कारवाई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कारवाई थंडावली आहे. यातच कोरोना काळ, निवडणुकाRचा काळ यामध्ये कारवाई ठप्प झाली. सद्यस्थितीत तुरळक कारवाई सुरू आहे. मात्र आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई होईल. दरम्यान, पाच हजारांचा दंड भरण्यासाठी होणारे वादविवाद, पोलीस आणि कायदेशीर कारवाईच्या मनस्तापामुळे पाच हजारांचा दंड कमी करण्याच्या विचारातही आहे. मात्र यासाठी धोरणात बदल करून महापालिका व नगरविकास विभागाचीही मंजुरी घ्यावी लागेल.