बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात पालिकेने धडक मोहीम सुरू केली असून गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या कारवाईत 1186 बेकायदेशीर हातगाडय़ा, 1839 सिलिंडर आणि 2410 इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ‘फेरीवाला मुक्त’ उपप्रमांतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.
मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱया तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघडय़ावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱया फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जाते. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. पोलिसांच्या सहकार्याने पालिका ही मोहीम राबवत आहे.
अशी झाली कारवाई
z मुंबईतील विविध विभागांमध्ये 18 जून 2024 पासून ते 4 जुलै 2024 या सतरा दिवसात झालेल्या कारवाईत चारचाकी हातगाडय़ा, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत.
z या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साधनसामुग्रीमध्ये जप्त साधनांची एकूण संख्या – 5,435 इतकी आहे. यामध्ये चारचाकी हातगाडय़ा – 1,186, सिलिंडर – 1,839 आणि स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे इत्यादी विविध प्रकारच्या साहित्याची संख्या 2,410 इतकी आहे.