उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना एक हजाराचा दंड, वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आक्रमक

मुंबईत प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकामाच्या ठिकाणी 28 नियम बनवले आहेत. या नियमांनुसार उघडय़ावर कचरा जाळण्यास मनाई करण्यात आली आहे, मात्र अजूनही काही जण उघड्यावर कचरा जाळत असून प्रदूषणात भर टाकत आहेत. अशा प्रकारे उघडय़ावर कचरा जाळणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारत मुंबई महापालिका 1 एप्रिलपासून एक हजाराचा दंड ठोठावणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी उघडय़ावर कचरा जाळणे, शेकोटी पेटवणे, लाकडाचा वापर करून जेवण बनवणे अशी कामे उघडय़ा भूखंडांवर, बांधकामांच्या ठिकाणी आणि रस्त्याच्या कडेला केली जातात. यामुळे होणारे वायू प्रदूषण टाळण्यासाठी अशा लोकांवर महापालिका प्रशासन सातत्याने कारवाई करत असते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत उघडय़ावर कचरा जाळणाऱयांवर पालिकेकडून 100 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येत होती, मात्र त्यानंतरही कचरा जाळण्याचे प्रमाण कमी न झाल्याने हा दंड वाढवून आता तो एक हजार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी उपनियम, 2006 अंतर्गत नियम 5.10 नुसार कचरा जाळणाऱयांविरोधात कारवाई केली जाते.