पहिल्याच दिवशी भायखळा, बोरिवलीमधील 80 बांधकामे बंद, प्रदूषणकारी बांधकामांना पालिकेचा दणका

मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून आज पहिल्याच दिवशी बोरिवली पूर्वमधील 45 तर भायखळ्यामधील 35 अशी 80 बांधकाम-प्रकल्पांचे काम बंद केले. ही कारवाई उद्यादेखील भरारी पथकांच्या माध्यमातून सुरूच राहणार असून प्रदूषणकारी प्रकल्प बंद करण्यात येणार असल्याची माहिती आर/मध्य बोरिवलीच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या प्रदूषणाने आपत्कालीन स्थितीकडे वाटचाल सुरू केल्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कठोर निर्णय घेत भायखळा, बोरिवली पूर्वमधील सर्व प्रकारची बांधकामे 24 तासांत ‘सेफ स्टेज’मध्ये आणून तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. वरळी, नेव्हीनगर कुलाब्यातही हवेची गुणवत्ता खालावल्याने या ठिकाणच्या बांधकामांबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचेही आयुक्तांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आज बोरिवली पूर्व आणि भायखळ्यात संबंधित वॉर्ड ऑफिसकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली. भरारी पथकांच्या माध्यमातून प्रत्येक साईटवर व्हिजिट देत पाहणी केल्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रस्ते धुलाई, स्वच्छतेचे काम सुरूच

प्रदूषणकारी प्रकल्प बंद करण्याची कारवाई करतानाच पालिकेच्या माध्यमातून बोरिवलीत स्वच्छता राखण्यासाठीदेखील काम केले जात आहे. यामध्ये ठिकठिकाणचा कचरा उचलणे, रस्त्यांची पाण्याने धुलाई, राडारोडा उचलून विल्हेवाटीसाठी पाठवणे आणि जनजागृती अशी कामे सुरू असल्याची माहिती आर/मध्यच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली.

आता रस्त्यावर चर खोदण्यास बंदी

प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीच्या, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या असून आता रस्त्यावर नव्याने चर खोदण्यासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, नवीन चर खोदकामास परवानगी देण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये फक्त पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीचे कामकाज वगळता नवीन चर खोदण्याच्या परवानग्या दिल्या जाणार नसल्याचे महानगरपालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.