
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वाढणारे तापमान आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आता नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे वाढता उकाडा आणि प्रदूषणाला नैसर्गिकरीत्या प्रतिबंध घालता येणार आहे. नव्या इमारतींना परवानगी देताना ही अट अर्जामध्ये समाविष्ट केली जाईल. याबाबतचा प्रस्ताव महानगरपालिकेने नगरविकास विभागाकडे पाठवला आहे.
मुंबईत वाढणारे तापमान, प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते धुलाई, स्वच्छता, स्प्रिंक्लरने फवारणी यांचा समावेश आहे.
जुनी इमारत मजबूत असली तर गार्डन
नव्या इमारतींचे प्लॅन पालिकेला सादर करतानाच अर्जामध्ये राखीव जागा आणि टेरेस गार्डन तयार करण्याची अट घातली जाईल. तर जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुती असेल तरच टेरेसवर गार्डन उभारता येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
इमारतीच्या 5 टक्के जागेत मियावाकी वने
- मुंबईला हिरवेगार करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मियावाकी वने तयार करण्यात येत आहेत. या वनांमध्ये काही दिवसांत झाडे मोठी होत असल्याने हिरवाई वाढत आहे.
- याच पार्श्वभूमीवर आता इमारतींच्या आवारात किमान 5 टक्के जागा मियावाकी वनांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- बांधकामातून उडणाऱया धुळीमुळे प्रदूषण होत असल्याने रस्तेकाम, बांधकामांसाठी 29 प्रकारच्या अटींची नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बांधकामे 20 ते 30 फूट बंदिस्त करून काम करण्यास परवानगी देण्यात येत आहे.