रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना दणका, पालिकेने वसूल केला 45 लाखांचा दंड; दोन वर्षांसाठी निविदाही भरता येणार नाही

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सुरू असलेली काँक्रीटीकरणाची कामे अजूनही निकृष्ट दर्जाची होत असून याप्रकरणी मुंबई महापालिकेने आरे वसाहतींमधील कंत्राटदाराला 5 लाखांचा तर इतर दोघा कंत्राटदारांना 40 लाखांचा दंड केला असून या कंत्राटदारांना दोन वर्षांसाठी कोणत्याही विभागातील निविदाही भरता येणार नाही. त्याचबरोबर दोन रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पांची नोंदणी रद्द करून 6 महिने काँक्रीट मिक्सचा पुरवठा करण्यास मनाई केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही कारवाई केली.

मुंबईत रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रीटीकरणाची सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची कबुली अर्थसंकल्प अधिवेशनात उद्योगमंत्र्यांनी दिली. याप्रकरणी मार्च महिन्यात चार कंत्राटदारांवर कोटय़वधींची दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्ते काँक्रीटीकरणावर देखरेख आणि समन्वय साधण्यासाठी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमण्याची घोषणाही उद्योगमंत्र्यांनी केली होती, मात्र त्यानंतरही मुंबईतील रस्त्यांना लागलेले निकृष्टतेचे ग्रहण काही थांबलेले नाही.

निकृष्ट दर्जा, दुरुस्तीतही दिरंगाई 

आरे वसाहतीतील दिनकरराव देसाई मार्गाचे सिमेंट काँक्रीट व मास्टिक अस्फाल्ट सुधारणा काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली तसेच दंडाची आकारणी करून निकृष्ट काम त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या, मात्र दुरुस्तीच्या कामातदेखील कंत्राटदाराने अक्षम्य दिरंगाई केली. त्यामुळे महापालिकेने त्याच्यावर कारवाई करत 5 लाखांचा दंड केला.

स्लम्प टेस्टचे महत्त्व 

काँक्रीटच्या कार्यवहन क्षमतेसाठी (वर्क एबिलिटी) ‘स्लम्प टेस्ट’ करण्यात येते. याचा उपयोग काँक्रीटमध्ये सिमेंट व पाण्याचे प्रमाण किती आहे, हे मोजण्यासाठी केला जातो. जर काँक्रीटमध्ये अतिरिक्त पाणी मिसळले तर काँक्रीटमधील सिमेंट व पाण्याचे प्रमाण गडबडते. त्याचा थेट परिणाम गुणवत्तेवर होतो. त्यामुळे रस्ते बांधणी कामात ‘स्लम्प टेस्ट’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काँक्रीटची गुणवत्ता तपासण्यासाठी पालिका प्रशासनाने रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पस्थळ आणि प्रत्यक्ष कार्यस्थळ या दोन्ही ठिकाणी ‘स्लम्प टेस्ट’ बंधनकारक केली आहे.

काँक्रीटीकरणाची कामे 31 मेपर्यंत पूर्ण करा 

मुंबईत सुरू असलेली रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे 31 मेपूर्वी पूर्ण करा, त्यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करा. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरवण्यात आली आहे तसेच रस्त्यांची कामे सुरू असताना अभियंत्यांनी उपस्थित राहा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यस्थळी आकस्मिक भेट (सरप्राईज व्हिजिट) द्यावी, कामे अधिक वेगाने पार पाडताना गुणवत्तेवरही भर द्या आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.