रस्ते कामात दिरंगाई केल्यास 50 लाखांचा दंड, कंत्राटदारांवर बडगा

मुंबईमधील रस्ते कामामध्ये दिरंगाई आणि सुमार दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत 50 लाख 53 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. खड्डे बुजवण्यास दिरंगाई केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. रस्ता दुरुस्ती कामामध्ये विलंब खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देतानाच पावसाने उघडीप देताच कंत्राटदारांनी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून तातडीने खड्डे बुजवावेत, रात्रपाळीतदेखील कामे करावीत, असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

विविध पर्यांयाद्वारे खड्डे, दुरुस्तीयोग्य रस्त्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे 24 तासांच्या आत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

दंडाची रक्कम बिलातून वसूल करणार

पालिकेने केलेल्या कारवाईत शहर विभागातील कंत्राटदारांना 8 लाख 85 हजार रुपये, पूर्व उपनगरांमधील कंत्राटदारांना 5 लाख 48 हजार रुपये, पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांना 24 लाख 85 हजार रुपये आणि महामार्ग कंत्राटदारांना 11 लाख 35 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या बिलातून ही रक्कम वसूल करून घेतली जाणार आहे.