बिल्डरांनी बांधलेल्या टॉवर्समधील घरे विकली जावीत म्हणून प्रदूषणाचे कारण देत मुंबई महानगरपालिकेने बोरिवलीच्या बाभईतील हिंदू स्मशानभूमीलाच टाळे ठोकले. त्याऐवजी अंत्यविधीची व्यवस्था गोराई खाडीच्या आकाशवाणी केंद्राजवळ करण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे बाभई व परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. ती टाळण्यासाठी बाभई स्मशानभूमीची डागडुजी करून ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने विधिमंडळात केली.
शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत यासंदर्भात विशेष उल्लेख सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले. बाभई हिंदू स्मशानभूमी मोडकळीस आल्याचे कारण देऊन गेल्या वर्षीपासून महापालिकेने बंद केली आहे. ती पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या स्मशानभूमीतील धुरामुळे प्रदूषण होत असल्याचे कारण सांगत तिचे स्थलांतरण गोराई खाडी आकाशवाणी केंद्राजवळ करण्याचे कारस्थान बिल्डर, महापालिका अधिकारी आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी रचले आहे, असे पोतनीस यांनी नमूद केले. बाभई स्मशानभूमीतील धूर कित्येक वर्षांपासून फिल्टर करूनच बाहेर सोडला जात आहे. मुंबईतील वाहने, बांधकामे यामुळे होणाऱया प्रदूषणाचे प्रमाण पाहता या स्मशानामुळे होणारे प्रदूषण फारच नगण्य आहे, असे आमदार पोतनीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्थलांतर न करता या स्मशानभूमीच्या डागडुजीचे काम त्वरित हाती घेऊन ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी विनंती पोतनीस यांनी सभागृहाला केली.