
मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात 6 महिन्यांपूर्वी नियुक्ती झालेल्या 235 जवानांचे प्रलंबित वेतन आणि प्रशिक्षण भत्ता आता लवकरच मिळणार आहे. कागदपत्रे तपासल्यानंतर जवानांचे आयडी नंबर बनवून त्यांचा 6 महिन्यांचा पगार आणि भत्ता आठवडाभरात देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता.
मुंबई अग्निशमन दलामध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे आग आणि इतर मोठय़ा दुर्घटनेत मुंबईतील जनतेच्या जीविताचे तसेच मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी 910पैकी 785 अग्निशामकांची पदे 6 महिन्यांपूर्वी भरली गेली. यामध्ये उर्वरित 235 अग्निशामक यांची 16 ऑगस्ट 2024 रोजी दलात नियुक्ती करण्यात आली. या अग्निशामकांची मुंबई अग्निशमन दलात नियुक्ती होऊन 6 महिने झाले तरी काही जणांचा प्रशिक्षण भत्ता व सर्व अग्निशामक यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे रखडलेले वेतन तातडीने द्यावे, अशी मागणी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेकडून बाबा कदम यांनी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि उपायुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे केली होती.
पगार, भत्ता का रखडला?
दलात नव्याने नियुक्त झालेल्या 235 जवानांनी बँक खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिली नसल्याने त्यांचे वेतन थकले होते. मात्र आता जवानांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून आठवडाभरात त्यांचे आयडी नंबर तयार करून पगार आणि भत्ता काढण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.