झोपडपट्टीतील व्यावसायिक मालमत्तांना भरावा लागणार कर, पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; उत्पन्नवाढीसाठी नव्या पर्यायांचा शोध सुरू

मालमत्ता कर हा मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता कराची देयके नियमितपणे देण्यासाठी कार्यवाही करावी, कारभार सोपा करावा आणि उत्पन्नवाढीसाठी झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना करकक्षेत आणावे, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमकेत महानगरपालिका आयुक्तांनी आज संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले, मुंबईकरांना पुरविल्या जाणाऱ्या नागरी सेवा-सुविधांच्या विकासासाठी कर उत्पन्न आहे. महानगरपालिकेचा आर्थिक रोख प्रवाह (कॅश फ्लो) सुरळीत ठेवण्यासाठीदेखील मालमत्ता कराची भूमिका महत्त्वाची ठरते. मुंबई महानगराची भौगोलिक रचना, लोकसंख्येची घनता, दाट लोकवस्ती विचारात घेता मालमत्ता करनिर्धारण व संकलन ही आव्हानात्मक बाब आहे. त्यावर मात करत करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी-कर्मचारी चांगली कामगिरी करत आहेत. मात्र अंदाजपत्रकीय उद्दिष्ट गाठणे म्हणजे कामगिरी नव्हे, तर मालमत्ता कराची संपूर्ण यंत्रणाच अद्ययावत करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

या वेळी पालिका आयुक्तांनी कर निर्धारण व संकलन खात्याच्या करसंकलन कामाचे कौतुकही केले. भायखळय़ातील अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या या संवादप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, करनिर्धारण व संकलन सहआयुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाणे आदी उपस्थित होते.

कर रचनेत होणार सुधारणा

z मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडे 2 लाख 43 हजार 989 मूळ मालमत्तांची नोंद आहे. यामध्ये निवासी आणि अनिनासी (व्यावसायिक) मालमत्तांचा समावेश आहे. शहर विभागात जुन्या मालमत्तांचा विकास होऊन उत्तुंग इमारती तयार होत आहेत. तसेच उपनगरांमध्येदेखील नवीन मालमत्तांमध्ये काढ होत आहे.

z मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी महानगरपालिकेने टप्पे निश्चित केले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कर आकारणीमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी सर्व नवीन बांधकामे, विद्यमान बांधकामे आणि मालमत्तेतील बदल, जर काही असतील तर याची माहिती घ्यावी, असे निर्देशही पालिका आयुक्तांनी करनिर्धारण व संकलन खात्याला दिले.