पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग झाले चकाचक, 12 किमी रस्त्याची स्वच्छता; 16 टन राडारोडा, 7 टन कचरा गोळा

मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ-सुंदर मोहिमेंतर्गत आज रात्री पूर्व-पश्चिम महामार्गांवर तब्बल 12 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत 16 टन राडारोडा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव ते घाटकोपर, घाटकोपर ते विक्रोळी, विक्रोळी ते मुलुंड चेक नाकादरम्यान तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे ते अंधेरी, अंधेरी ते कांदिवली 90 फूट मार्ग, कांदिवली 90 फूट मार्ग ते दहिसर चेक नाका यादरम्यान विशेष स्वच्छता करण्यात आली.

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या स्वच्छतेची मोहीम राबविल्यानंतर आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या स्वच्छतेसाठी 17 मार्च 2025 पासून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत दोन्ही महामार्गालगतचे सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आदी परिसर स्वच्छ करण्यात येत आहेत. महामार्गावरील दिशादर्शक फलक, झाडांच्या बुंध्यांची व कुंपणांची स्वच्छता व रंगरंगोटी, बस थांब्यावरील आसन व्यवस्था नीट करणे, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, रस्त्यावर अडथळा ठरणारी जुनी वाहने तसेच अनधिकृत जाहिरात फलकांचे निष्कासन, पदपथांचे पेव्हर ब्लॉक व दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली जात आहे.

असे झाले काम

स्वच्छता मोहिमेत गुरुवारी रात्री 16 टन राडारोडा, 7.7 टन कचरा आणि चार टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स, लिटर पिकर्स, मिस्टिंग मशीन, डंपर आणि वॉटर टँकर्स अशा एकूण 16 यांत्रिक स्वच्छता संयंत्रांचा या मोहिमेत वापर करण्यात आला.